पुणे

Pcmc News : मेट्रोचा मार्ग आयटीयन्ससाठी अडथळ्यांची शर्यत

अमृता चौगुले

हिंजवडी : मागील तीन वर्षांपासून हिंजवडी मेट्रोच्या कामास सुरुवात झालेली आहे. यात अनेक अडथळे असूनदेखील या कामाच्या पूर्ततेकडे प्रशासनाचे लक्ष आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. या मेट्रोमुळे भविष्यात आयटी कर्मचार्‍यांचा मार्ग सुखकर होणार असला, तरीदेखील आता मात्र मेट्रोच्या कामांमुळे आयटीयन्सना आपला मार्ग शोधत प्रवास करावा लागतो आहे.

खोदकामामुळे रस्ता अरुंद
कोरोना आणि लोकडाऊननंतर असलेल्या अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम आता टप्प्याटप्याने बंद केले जात आहे. पुन्हा एकदा आयटी कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी कामास येत आहेत. त्यामुळे सकाळी-संध्याकाळी असलेली वाहतूककोंडी पुन्हा एकदा नित्याचाच विषय आहे. यातच मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी बेरिगेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत तर काही ठिकाणी रस्तेच बंद करून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयटी कर्मचार्‍यांचा रस्ता खडतर झालेला आहे.

वाहनचालकांची गैरसोय
प्रामुख्याने टेक महिंद्राजवळील मेगा पॉलिस येथील रस्ता मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांना वळसा घेत प्रवास करावा लागत आहे. या संपूर्ण रस्त्यालगत लोखंडी बेरिगेट्स आणि कॉलम लावण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे क्षेत्र व्यापले असल्याने दोन्ही बाजूस केवळ वीस-वीस फुटांपर्यंत रस्ता वाहतुकीस शिल्लक आहे. यातूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यात आयटी पार्क फेज 2 येथील सर्कल, फेज 2 येथील तमन्ना हॉटेल जवळील सर्कल तसेच हॉटेल मेझा 9 जवळ एकेरी वाहतुकीच्या ठिकाणी कॉलमचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कॉर्नरजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. त्यासह हिंजवडी येथील मुख्य शिवाजी चौक येथेदेखील कॉलमसाठी खोदाई करण्यात येत असल्याने येथील वाहतूक समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

SCROLL FOR NEXT