पुणे; पुढारी वृत्तसेवा : चालूया, चालत राहूया, दंगलमुक्त पुणे, दंगलमुक्त महाराष्ट्र आणि दंगलमुक्त भारत बनवूया…अमन के हम रखवाले, सब एक हैं… जुल्म से लडनेवाले सब एक हैं… गोली नहीं, बोली चाहिए… असे विविध फलक हातात घेत नफरत छोडो, भारत जोडो, अशा विविध घोषणा देत सोमवारी शांती मार्च काढण्यात आला. या शांती मार्चमध्ये तरुणांनी सहभागी होत एकोप्याचा नारा बुलंद केला. विविध घोषणा आणि विविध फलक हातात घेऊन त्यांनी समाजाला एकात्मतेचा संदेश दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे हा शांती मार्च काढण्यात आला. गांधी भवन (कोथरूड) ते फग्युर्सन महाविद्यालय रस्ता येथील गोपाळ कृष्ण गोखले यांचा पुतळा या मार्गापर्यंत हा शांती मोर्चा काढला. विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. अन्वर राजन, संदीप बर्वे, सतीश देशमुख मोर्चात सहभागी झाले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी 'दंगल घडू नये, यासाठी अशा प्रकारच्या शांती मोर्चा आणि शांती विचारांची आज देशाला आणि आजच्या युवा पिढीला गरज आहे. मी हिंसा करणार नाही आणि जिथे दंगा होत असेल तो शांततापूर्ण मार्गाने थांबविण्यासाठी प्रयत्न करेन, अशी तरुणांनी शपथ घेणे आवश्यक आहे,' असे सांगितले. 'राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय', 'एक रुपया चांदी का, सारा देश गांधी का' अशा घोषणा देत हा शांती मार्च काढण्यात आला.
गणेशोत्सवात अहोरात्र सेवा देणार्या 21 सफाई कर्मचार्यांचा सोमवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सन्मान करण्यात आला. भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सफाई कर्मचार्यांचा सत्कार भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते करण्यात आला. 'सत्काराचे क्षण आमच्या वाट्याला फार कमी वेळा येतात. स्वच्छतादूत म्हणून करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल आम्ही ऋणी आहोत,' असे सफाई कर्मचारी आणि मुकादम गोपाल गोरखे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पीयूष शहा, श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, गोविंदा वरंदानी, आयाझ खान, दत्ता अदमुलवार, अंजला खान आदींनी केले.
हेही वाचा