पुणे: गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी उष्णतेची लाट यंदाच्या एप्रिलमध्ये पुणेकर सहन करीत आहेत. रविवारी अवघे राज्य थंड झाले. मात्र, पुणे शहराचा पारा काही खाली आला नाही. लोहगावचे तापमान 42.8 अंशांवर गेल्याने राज्यात सर्वोच्च ठरले. तर शिवाजीनगरचा पारा 40.6 अंशांवर होता. एप्रिल महिन्यातील सलग 27 दिवस ही लाट सुरू असल्याने ती विक्रमी ठरली आहे.
राज्यात यंदा एप्रिल सर्वात उष्ण महिना ठरला आहे. तर पुणे शहरात 30 एप्रिल 1897 मध्ये पारा 43.3 अंशांवर गेला होता, मात्र 24 एप्रिल रोजी तो विक्रम यंदा मोडीत निघाला. त्या दिवशी शहरातील लोहगावचे तापमान 43.6 अंशांवर गेले होते.
आजवरचे हे एप्रिलमधील विक्रमी तापमान ठरले आहे. तसेच शिवाजीनगर हे आजवर पुणे शहरासाठी प्रमाण मानले जात होते. त्यात आता लोहगावची भर पडली असून शिवाजीनगर आणि लोहगाव अशी दोन तापमानं राज्याच्या यादीत दररोज प्रमाण म्हणून दिली जात आहेत. शिवाजीनगरचा पारा देखील गेले 27 दिवस 40 अंशांखाली आलेला नाही.
‘सिग्नल दुपारी बंद ठेवा...’
शहरातील वाहतूक सिग्नल दिवसर सुरू आहेत. भरदिवसासुद्धा टळटळीत उन्हात वाहनचालकांना सिग्नलवर उभे राहण्याची जणू शिक्षाच सुरू आहे. दंड पडू नये म्हणून नागरिक उन्हात भाजून निघत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांना आवाहन केले आहे की, निदान दुपारी 1 ते 4 पर्यंत सर्वच रस्त्यांवरचे सिग्नल बंद ठेवा किंवा कमी टायमरचे ठेवा. जास्त वेळ सिग्नलवर उभे राहिल्यास उष्माघात होऊ शकतो, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बंगालच्या उपसागरातून दमट वारे आल्याने राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान घटले. मात्र, पुणे शहरातील लोहगाव आणि शिवाजीनगरचा पारा उतरला नाही, याला स्थानिक कारण आहे. सध्या 48 तासांत पारा किंचित घटणार आहे. मात्र पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज आहे.- डॉ.अनुपम कश्यपी, माजी विभागप्रमुख, आयएडी, पुणे