पुणे; पुढारी वृत्तसेवा : मासिक पाळी हा महिलेच्या आरोग्यचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. यादरम्यान, स्वच्छता न बाळगल्यास योनिमार्गाचा संसर्ग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, प्रजननक्षमतेवर परिणाम अशा विविध आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता पाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दर वर्षी 28 मे हा मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. आरोग्यचक्रातील मासिक पाळीचे महत्त्व, मासिक पाळीच्या दिवसांमधील स्वच्छतेची गरज आणि जनजागृती हा या दिवसामागील उद्देश आहे. या दिवसांमध्ये घरगुती कापडाचा वापर करण्याऐवजी सॅनिटरी पॅडचा वापर व्हावा, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.
याशिवाय, पॅडऐवजी मेन्स्ट्रूअल कप, टॅम्पॉन आदी साधने वापरण्याबाबतही प्रोत्साहन दिले जात आहे. सॅनिटरी नॅपकिन्स बदलल्यानंतर हात साबणाने स्वच्छ न धुतल्यास संसर्ग होऊ शकतो. पॅड, कप किंवा टॅम्पॉन जास्त वेळ घालल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे, मूत्रमार्गातील संक्रमण, योनिमार्गाचे संक्रमण आणि योनिमार्गातील आजूबाजूच्या त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते.
स्वच्छता कशी पाळावी?
मासिक पाळीमध्ये होणा-या रक्तस्रावाचा अंदाज घेऊन दर 4-5 तासांनी सॅनिटरी पॅड बदलावे. श्र तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कप किंवा टॅम्पॉन वापरावा. कोणतीही शंका असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांशी मोकळेपणाने बोला.श्र मासिक पाळीच्या काळात योनिमार्ग स्वच्छ ठेवणे गरजेचे असते.श्र पाळी सुरू असताना स्वच्छ सुती अंत:र्वस्त्रांचा वापर करावा. श्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे, क्रीम किंवा रसायने वापरणे टाळावे.
मासिक पाळीबद्दल किशोरवयीन मुलींच्या मनात खूप भीती असते. अशा वेळी आईने मुलींशी मोकळेपणाने संवाद साधावा. मासिक पाळीचे चक्र, स्वच्छता, पॅडचा योग्य वापर याबाबत समजावून सांगावे. घरातील पुरुषांशीही मासिक पाळीतील शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल बोलले गेले पाहिजे.
– डॉ. अरुंधती लिमये, स्त्रीरोगतज्ज्ञ
शहरात मासिक पाळीविषयी ब-यापैकी खुलेपणा आढळून येतो. मात्र, दुर्गम भागांमध्ये आजही भयंकर परिस्थिती आहे. अशा वेळी 'आहे रे' वर्गाने 'नाही रे' वर्गाला हात द्यायला हवा. त्यासाठी समाजबंध संस्थेतर्फे 28 मेपासून भामरागडमधील 20 गावांमध्ये जनजागृतीपर 'सत्याचे प्रयोग' शिबिर सुरू होत आहे. यानिमित्त तेथील महिलांना स्वच्छता, सुरक्षिततेचे महत्त्व समजावून दिले जाणार आहे. याचप्रमाणे आरोग्यतपासणी, पथनाट्य, पॅड वाटप आणि प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जाणार आहेत.
– सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.