गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या File Photo
पुणे

Pune News: गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालन उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी त्यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

पुढारी वृत्तसेवा

चाकण: सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये; अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 29) केले.

चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालन उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी त्यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लहानातील लहान माणसापासून अनेक लोकांना सोने आणि सोन्याचे दागिने वापरणे आवडते. (Latest Pune News)

एकंदरीतच लोकांचे राहणीमान बदलत आहे. पर्चेसिंग पावर वाढली आहे. त्यामुळे अनेक जण मोठ-मोठ्या ज्वेलर्समध्ये जाऊन चांगले सोने खरेदी करतात. एखादा प्रसंग आलाच तर सोने गहाणही ठेवता येते. वेळेला त्याचे पैसेही करता येतात. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे. कुणीतरी सोन्याचे कपडेही शिवले होते, हे आपण पाहिले आहे. पण ते सगळं अति होत आहे.

मला या सगळ्यांना सांगायचे आहे की, सोनं हे आपल्या आईच्या, पत्नीच्या, लाडक्या बहिणीच्या किंवा मुलीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर एवढं सोनं काही शोभून दिसत नाही. त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका.

आपण त्या बैलाला साखळी घालतो, तशा साखळ्या घालतात आणि येतात समोर. जे कुणी अशा साखळ्या घालतात ते त्यांच्या पैशांनी घालतात. मला काही त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, पण ते सोने त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना दिले तर जास्त चांगलं होईल, असा सल्ला उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दिवाळीपर्यंत बळीराजाला संकटातून बाहेर काढणार

सर्व मंत्र्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागात दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उद्ध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिकच अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे ठरविले आहे. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीने 5 हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

चाकणमधील वाहतुकीची समस्या लवकरच सुटणार

पुणे-नाशिक व तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन्ही महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी तसेच चाकण शहरासह औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चाकणमध्ये वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना अवघ्या दोन-पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तास-दीड तास लागतो.

हा त्रास नागरिकांनी आजवर खूप सहन केला आहे, याची मला जाणीव असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महामार्गांची कामे परतीचा पाऊस उघडल्यानंतर तत्काळ सुरू करण्यात येतील. निविदा प्रक्रियेला वेग देण्यात आल्याचे देखील उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT