उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : 'वंदे भारत' रेल्वेमुळे लोकल गाड्या उशिरा येत असून, दौंड-पुणे-बारामती-पुणे तसेच संध्याकाळी पुण्याहून 7.45 ची मेमू रेल्वे या रोजच उशिराने धावत आहेत. त्यामुळे सर्व प्रवासी, कामगार, विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
'वंदे भारत' रेल्वे ही सामान्य लोकांसाठी नसून श्रीमंत आणि व्यापारी यांच्यासाठी केलेली सोय असल्याचा आरोप सर्वसामान्य प्रवासी करीत आहेत. कारण, या गाडीमुळे सामान्य लोकांना फायदा नसून ही गाडी पॅसेंजर रेल्वेच्या वेळेत सोडल्यामुळे रोज कामावर व घरी जाण्यास उशीर होत असून, सर्वांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
बारामती ते पुणे डेमू लोकल ही बारामती-पुणे मार्गावर राहणार्या अनेकांची जीवनवाहिनी आहे. परंतु, सध्या बारामती-पुणे लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेकडून बारामती ते पुणे आणि पुणे ते बारामती, अशा लोकलच्या फेर्यांसाठी दररोज संध्याकाळी पुण्यावरून 6.45 आणि सकाळी दौंडवरून 8.25 ला लोकल वेळेवर सुटणे अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. यासह डेमू लोकल वेळेवर न येणे, वेळेवर न सुटणे, अनेक ठिकाणी वेळेपेक्षा जास्त स्टॉपेज घेणे, पूर्वीपेक्षा कमी गाड्या सोडणे, असा त्रास दररोज सुरू आहे.
लोकलचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयांचे वेळापत्रक देखील कोलमडत आहे. चाकारमान्यांना उशिरा कार्यालयात गेल्याने हाफ डे लागत आहे. दरम्यान, वारंवार प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे विभागाकडे तक्रारी करून देखील आजवर कोणतीही ठोस उपाययोजना रेल्वेकडून करण्यात आलेली नाही. याबाबत तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्यामुळे 'वंदे भारत' रेल्वेला काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे मत हर्षल शिंदे, लहू गावडे, दादा पवार, निखिल गावडे, सागर शेळके आदी प्रवाशांनी सांगितले.