पुणे: दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने गुरुवारी (दि. 3 जुलै) प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायकीने सजलेला ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्या’चा कार्यक्रम रंगणार असून, श्री विठुनामाचा गजरही या कार्यक्रमात दुमदुमणार आहे.
या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांना रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, आषाढी वारीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आयोजित केला आहे. (Latest Pune News)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. सगळीकडे भक्तिपूर्ण वातावरण रंगले आहे अन् भक्तीचा- नामस्मरणाचा गजर पुण्यातही घुमणार असून, पं. संजीव अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केलेल्या भक्तिरचनांनी ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्या’ कार्यक्रम रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुप हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर आहेत, तर बढेकर डेव्हलपर्स हे सहप्रायोजक आहेत. पं. अभ्यंकर हे मराठी अभंगांसह काही हिंदी संतरचनाही सादर करणार आहेत.
यातील बहुसंख्य रचना पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केल्या आहेत. काही रचना संगीतकार केदार पंडित यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), प्रथमेश तरळकर (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. तर विलीना पात्रा, साईप्रसाद पांचाळ, मुक्ता जोशी आणि रुद्रप्रताप दुबे हे स्वरसाथ करणार आहेत.
पं. अभ्यंकर यांची मराठी, हिंदी आणि संस्कृत या तीन भाषांमधील रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रसिकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. भक्तिसंगीताच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले असून, पं. अभ्यंकर यांनी पूर्वजांनी केलेल्या रचनांचेच कार्यक्रम सादर करण्यात समाधान मानले नाही, तर स्वत:च्या गायकीसाठी काही रचना बांधल्या.
त्यांनी मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती केली आहे आणि त्यांच्या 50 हून अधिक अल्बमना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. भक्तिसंगीताच्या क्षेत्रात त्यांनी नवनिर्मिती करून मोठी भर घातली आहे. संगीताच्या क्षेत्रात मोठे योगदान देणार्या पं. अभ्यंकर यांच्या भक्तिरचनांची स्वरानुभूती रसिकांना कार्यक्रमातून मिळणार आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे...
दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पर्वती ः सकाळी 10 ते सायं 5.
ग्राहकपेठ, टिळक रस्ता ः सकाळी 10 ते सायं 5.
कार्यक्रम कधी: गुरुवारी, 3 जुलै
कुठे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
वेळ: सायंकाळी 6 वाजता