पुणे: निर्धन व आर्थिक दुर्बल रुग्णांना रात्रीच्या वेळीही विनाअडथळा उपचार मिळावेत, यासाठी पुणे विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी वैद्यकीय समाजसेवक पूर्ण वेळ म्हणजे 24 तास उपलब्ध ठेवणे अनिवार्य असल्याचे आदेश पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांनी जारी केले आहेत.
येत्या 20 ऑगस्ट रोजी झालेल्या धर्मादाय रुग्णालयांच्या देखरेख समितीच्या बैठकीत, अनेक रुग्णालयांत पूर्णवेळ समाजसेवक नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे योजनेतील लाभार्थी तसेच गरीब रुग्णांना उपचार मिळण्यात अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर नवीन आदेश काढण्यात आला आहे. (Latest Pune News)
आदेशात नमूद केल्याप्रमाणे, धर्मादाय रुग्णालयांनी वैद्यकीय समाजसेवक आळीपाळीने नियुक्त करून त्यांची उपस्थिती 24 तास सुनिश्चित करावी. तसेच संबंधित समाजसेवकांचे नाव व संपर्क क्रमांक हे वैद्यकीय अधीक्षकांकडे असावेत.
रात्रीच्या वेळी आलेल्या गरीब रुग्णांना मार्गदर्शन करणे व आवश्यक समन्वय साधणे ही त्यांची थेट जबाबदारी राहील. याशिवाय, समाजसेवक अथवा समन्वयकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करणे बंधनकारक असल्याचेही सहआयुक्तांनी स्पष्ट केले आहे.