पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक गुंतागुंतीच्या आजाराच्या रुग्णांची गेल्या आठवड्याभरात 32 एवढी नोंद झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आठवड्याभरात 41 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जीबीएसची साथ आटोक्यात येत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
सध्या राज्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. राज्यात गुरुवारी जीबीएसच्या नवीन 2 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 205 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 205 रुग्णांपैकी 94 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. 41 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 32 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत.
सध्या 50 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 8 मृत्यू झाले असून, यापैकी 4 मृत्यू जीबीएसने झाल्याचे निश्चित निदान झाले आहे. चार संशयित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.