वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना रुग्णालयाचे प्लॅनिंगच नाही! Pudhari
पुणे

Pune Medicial College: वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना रुग्णालयाचे प्लॅनिंगच नाही!

मनपा आयुक्तांनीच दिली कबुली : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

Medical college without hospital plan

पुणे: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महविद्यालय उभारताना विद्यार्थ्यांच्या सरावासाठी रुग्णालय उभारणे गरजेचे असताना त्याचा विचारच करण्यात आला नसून पालिकेने कोणतेही नियोजन केले नव्हते. तसेच, या महाविद्यालयात पायाभूत सुविधा देण्यास देखील महानगरपालिका अपयशी ठरल्याची कबुली आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

त्यामुळे येत्या काळात हा दवाखाना उभारण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार असून, चार महिन्यांत मेडिकल कॉलेजसाठी 430 बेडची सुविधा असणारे रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली. (Latest Pune News)

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) मनपाच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात 430 खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या अटीवर या महाविद्यालयाला मान्यता दिली होती. मात्र, तीन वर्षे होऊनही दवाखाना व इतर सुविधा नसल्याने या कॉलेजची मान्यता का रद्द करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस दोन महिन्यांपूर्वी एनएमसीने पाठवली होती.

हे प्रकरण गांभीर्याने घेऊन यावर लक्ष देण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी (दि. 17) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचा दौरा करत विभिन्न समस्यांसंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखांची बैठक घेतली. या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीबाबत माध्यमांना माहिती देताना नवल किशोर राम म्हणाले, हे महाविद्यालय उभारताना 430 खाटांचे रुग्णालय उभारणे गरजेचे होते. मात्र, त्या वेळी याचा विचार झाला नाही. त्यामुळे आता हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. येत्या चार महिन्यांत हे रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे.

कोणतेही नियोजन नसताना तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मेडिकल कॉलेज सुरू केले. त्यावेळीच विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. सद्य:स्थितीत मेडिकल कॉलेजचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. मात्र, दवाखान्यासंदर्भात काहीच ठोस झालेले नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या चार महिन्यांच्या कालावधीत या संदर्भात वेगाने पावले उचलली जातील.

कमला नेहरू रुग्णालयाचे बळकटीकरण

कमला नेहरू रुग्णालयाचे बळकटीकरण आम्ही करणार आहोत. येथे देखील खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. याचा वापर वैद्यकीय महाविद्यालयासाठी केला जाणार आहे. यासाठी देखील 700 कोटी लागणार आहे. हा निधी राज्य सरकारमार्फत मिळविण्याचा प्रयत्न आहे. निधी मिळेपर्यंत महापालिका स्वत: खर्च करणार आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ

मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी 400 कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया देखील लवकरच राबविली जाणार आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

रुग्णालयाचा आकृतिबंध मंजूर

वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती करण्याच्या प्रक्रियेला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. अनेकदा जाहिराती दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याने ही भरती 11 महिन्यांसाठी न करता जास्त कालावधीसाठी करता येईल का ? याचा विचार सुरू आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, सिस्टर, कर्मचारी, यांच्या आकृतीबंधाला मान्यता देण्यात आल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

तीन टप्प्यांत करणार काम

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू असून तीन भागात हे बांधकाम करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे काम 90 टक्के पूर्ण झाले. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले प्रशस्त रुग्णालय महापालिकेकडे अद्यापही उपलब्ध नसल्याने त्याचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले जाणार आहे. दोन्ही प्रकल्पासाठी 1400 कोटी लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT