पुणे: पुणे हे महाराष्ट्रासह देशातील एक प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी हब असूनही रेल्वे कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नाही. राजधानी, वंदे भारत किंवा तेजस सारख्या हाय स्पीड रेल्वे पुणे शहरातून दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख महानगरांसाठी उपलब्ध नाहीत.
यामुळे व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पुणे शहराला हायस्पीड रेल्वेच्या मार्गाशी जोडावे, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी राज्यसभेत केली.
खा. कुलकर्णी यांनी पुणे शहरातील रेल्वे कनेक्टिव्हिटीची सध्याची स्थितीच राज्यसभेत मांडली. त्या म्हणाल्या की, सध्या नवी दिल्ली ते पुणेदरम्यान सुमारे तीन ते चार गाड्या धावतात. पुण्यातून सुमारे 1550 किमी अंतर कापतात.
यातील सर्वात वेगवान गाड्या जसे की, झेलम आणि गोवा एक्स्प्रेस, सुमारे 25 ते 28 तास घेतात. पुण्याहून राजधानी एक्स्प्रेस धावत नाही. त्यामुळे प्रवाशांना राजधानी पकडण्यासाठी प्रथम मुंबईला जावे लागते. ज्यामुळे प्रवास महागडा आणि वेळखाऊ होतो.
आयटी हबला कनेक्टिव्हिटी नाही
पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे आयटी, ऑटोमोबाईल हब आहेत. पण त्यांच्यामध्ये तेजस किंवा वंदे भारत ट्रेन नाही, ज्यामुळे व्यवसाय आणि पर्यटनावर परिणाम होतो आहे. पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख औद्योगिक आणि कृषी केंद्रे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये थेट रेल्वे सेवा नाही. प्रवाशांना प्रथम मुंबईला जावे लागते, नंतर तेथून नाशिकला जाणारी ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे प्रवास महाग आणि गैरसोयीचा होतो. रस्त्याने प्रवास करण्यासाठी 5 ते 6 तास लागतात आणि ते अधिक महाग देखील आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
प्रमुख तीर्थस्थाने जोडा
पुण्याहून हजारो भाविक दररोज वैष्णोदेवी, तिरुपती, चारधाम, काशी, रामेश्वरम आणि शिर्डी येथे प्रवास करतात. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी नियमित तीर्थयात्रा गाड्या उपलब्ध नाहीत. भारत गौरव ट्रेन योजनेंतर्गत पुण्याहून धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या चालवण्यात याव्यात.
रेल्वेमंत्र्यांकडे या मागण्या केल्या
नवी दिल्ली-बेंगळुरू आणि नवी दिल्ली-हैदराबाद मार्गांवर धावणार्या राजधानी गाड्या पुण्यातून दररोज किंवा आठवड्यातून तीनदा चालवा.
पुणे-नाशिकदरम्यान थेट रेल्वे सेवा त्वरित सुरू करावी.
भारत गौरव ट्रेन योजनेंतर्गत पुण्याहून प्रमुख तीर्थस्थळांसाठी विशेष गाड्या हव्या.