पुणे : अवकाळी पावसामुळे शहरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्रवारी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मेमध्ये निविदा काढून नालेसफाई, गटारांची स्वच्छता केली जाते. तसेच, रस्त्यांवरील चेंबरचीही स्वच्छता केली जाते.
याशिवाय पाणी तुंबणारी व साचणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जातात. शहरात पाच महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नाल्यांना व रस्त्यांना तलावांचे स्वरूप आले होते.
अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर पुन्हा पाणी तुंबणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जातील, असा दावा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला होता. त्यानंतर पाणी तुंबणार्या 146 ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात बैठक घेतली होती.