पुणे

सावधान! पुण्यालाही गोवरचा ‘ताप’; सात संशयित बालके ‘नायडू’त दाखल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात गोवरचे संशयित रुग्ण आढळले असून, त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित रुग्ण 3 ते 12 वर्षे वयोगटातील असून, एकाच कुटुंबातील आहेत. त्यापैकी 5 जण रविवार पेठेतील, तर 2 जण कोंढव्यातील आहेत. कोंढव्यात राहणारे दोन संशयित रविवार पेठेत नातेवाइकांकडे आले होते. यापैकी एकाही बालकाने गोवरची लस घेतलेली नाही.

राज्यात गोवरचा उद्रेक सुरू असताना पुण्यातही गोवरचा शिरकाव झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ताप, अंगावर पुरळ, अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. सर्व संशयितांचे नमुने हाफकीन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. दहा ते पंधरा दिवसांत अहवाल येणे अपेक्षित असून, त्यांना बरे वाटेपर्यंत उपचार सुरू ठेवले जाणार आहेत.

मुंबईत गोवरचा उद्रेक सुरू झाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील संभाव्य हॉटस्पॉट ठरू शकणार्‍या परिसरांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत 1 लाख 6 हजार 308 घरांचे सर्वेक्षण झाले असून, 77 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच्या आठ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह जुलै ते सप्टेंबर महिन्यातील गोवरच्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 8 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी प्राप्त झाला.

मात्र, सर्वजण उपचारानंतर बरे झालेले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 226 गोवर संशयित बालकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी आतापर्यंत 8 जण गोवर पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, ते रुग्ण ऑगस्ट ते सप्टेंबरमधील होते व त्यांचे अहवाल 3 डिसेंबरला आले. त्यामुळे ते सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अजूनही 102 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

स्थानिक पातळीवरही टास्क फोर्स
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही स्थानिक पातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह डॉ. चेतन खाडे, डॉ. सूर्यकांत देवकर यांचा समावेश आहे.

शिक्षकांना सजग राहण्याच्या सूचना
संशयित रुग्ण आढळल्यानंतर संबंधित परिसरात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. चेतन खाडे आणि महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी पाहणी केली. शहरातील बालरोगतज्ज्ञांची एक बैठक नुकतीच झाली असून, दुसरी बैठक मंगळवारी होणार आहे. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सात संशयित रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वजण 3 ते 12 या वयोगटातील आहेत. एकाही मुलाचे गोवर लसीकरण झालेले नाही. सर्व संशयितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
                                                                      – डॉ. सूर्यकांत देवकर,
                                                                      लसीकरण विभागप्रमुख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT