पुणे: अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासाचे धागेदोरे थेट ड्रग पेडलर आणि ग्राहकांना मेफेड्रॉन (एमडी) पुरवठ्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर एमडीची नशा करणाऱ्यांची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. 6) आयुक्तालयात हजेरी घेतली. विशेष म्हणजे, यातील काहींचा संपर्क शहरातील काही पबच्या पीआरओशी (पब्लिक रिलेशन ऑफिसर) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
नशा करणाऱ्यांमध्ये गावचा उपसरपंच, मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी, कुरिअर बॉय, कामगार, बांधकाम व्यावसायिक, रिक्षाचालक, इस्टेट एजंट आणि वाहनचालक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. अशा एकूण 21 जणांना आयुक्तालयात बोलावून त्यांची पोलिस आयुक्तांसमोर परेड घेण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून डोजियर भरून घेण्यात आले.
यापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आणि 14 गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीसह त्याच्या साथीदारांना उत्तमनगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यात मुख्य आरोपी सुनील गोपाळ राठोड ऊर्फ राठ्या राठोड (वय 28), राजन गोपाल नायर (वय 37), जतीन जयवंत कदम (वय 26, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय 28, रा. कोंढवे धावडे) यांचा समावेश आहे.
मुलीचे अपहरण करणाऱ्या राठ्या राठोडकडे चौकशीदरम्यान मेफेड्रॉनच्या दोन पुड्या आढळून आल्याने मोठे ड्रग रॅकेट उघडकीस आले. ड्रग्ज विक्री करणारे आणि सेवन करणारे अशा 76 जणांची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपास पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांकडून ड्रग तस्करीत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आरोपी राठोडच्या मोबाईलची तपासणी केली असता, गेल्या चार महिन्यांत ड्रग्ज खरेदी-विक्रीचे सुमारे 300 हून अधिक व्यवहार झाल्याचे आढळले. या व्यवहारांची एकूण रक्कम सुमारे 9 लाख रुपये असून, त्यामध्ये दोन ते अडीच हजार रुपयांच्या व्यवहारांचे प्रमाण अधिक आहे. काही व्यवहार 10 ते 15 हजार रुपयांपर्यंतचेही असल्याचे निष्पन्न झाले आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे