पुणे

आयपीएल हुकल्याने ’एमसीए’चा महसूल बुडाला : आयपीएलचा एकही सामना पुण्यात नाही

Laxman Dhenge

पुणे : यंदा पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मैदानावर पहिल्या यादीनुसार आयपीएलचा एकही सामना रंगणार नसल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. एमसीएच्या मैदानावर आयपीएलचा सामना झाल्यास बीसीसीआय प्रत्येक सामन्याला 30 लाख रुपयांचा निधी देते. तोही या वर्षी मिळणार नसल्याने एमसीएचा महसूल बुडणार आहे.दुसर्‍या यादीची पुण्याला प्रतीक्षा
बीसीसीआयने आयपीएच्या 22 मार्च ते 26 मे यादरम्यानच्या सामन्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार पहिल्या यादीमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम, कोलकाता येथील ईडन गार्डन, अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम, बेंगळुरूचे एम. चिन्नास्वामी, दिल्लीचे फिरोजशाह कोटला आणि हैदराबादचे राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम यांचा समावेश आहे. बीसीसीआयकडून दुसरी यादी जाहीर केली जाईल, तेव्हा पुण्याला सामन्यांबाबत झुकते माप मिळेल, अशी पुण्यातील क्रिकेटरसिकांना अपेक्षा आहे.

आयपीएलमध्ये खेळणार्‍या प्रत्येक संघातील मालकांनी होम ग्राउंडवर सामने खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून संघ नसल्याने एमसीएला आयपीएलचे सामने मिळाले नाहीत. बीसीसीआय स्टेडियमला सामने देण्याबाबतचा निर्णय घेत असते. तरीही एमसीएच्या वतीने आयपीएलचे सामने पुण्याला देण्यात यावेत अथवा उपांत्यपूर्व फेरीत अथवा उपांत्यच्या लढती मिळाव्यात, अशी मागणी केलेली आहे.

– सुभेंद्र भंडारकर, सचिव, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन

बीसीसीआयकडून पहिली यादी जाहीर

गहुंजे येथील स्टेडियमवर 2022 मध्ये आयपीएलचे 15 सामने, तर महिलांच्या आयपीएलचे 4 सामने रंगले. प्रत्येक सामन्याला बीसीसीआयकडून 30 लाख रुपयांचा महसूल मिळतो. 2022 मध्ये आयपीएलच्या माध्यमातून साधारणतः 5 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मिळाला. या निधीमधून खर्चही होत असतो. पार्किंग, सिक्युरिटी, साफसफाई कर्मचारी आणि इतर खर्च यातून केला जातो. परंतु, या वर्षी महिला आयपीएल अथवा पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेचा एकही सामना नसल्याने हा निधी बुडणार आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः आयपीएलचे 10 सामने या स्टेडियमवर खेळविले जातात. 2023 मध्येही आयपीएलचा एकही सामना खेळविण्यात आला नव्हता. मात्र, विश्वकरंडकाचे पाच सामने पुण्याला देण्यात आले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT