MCA Election Controversy Pudhari
पुणे

MCA Election Controversy: एमसीए निवडणुकीत रोहित पवार अपात्र? वादग्रस्त मतदार यादीने उडवली भिंत

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आज न्यायालयीन सुनावणी, नवमतदार अपात्र ठरण्याची शक्यता; आजीव सदस्यांमध्ये अवैध घुसखोरीचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार जुलै 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावर निवडून आले होते. त्यामुळे, ते एमसीएच्या निवडणुका लढण्यास अपात्र ठरतात, असा आक्षेप केदार जाधव यांनी नोंदवला होता. लोढा समितीच्या शिफारशीनुसार क्रिकेटव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघटनेत पदावर असलेली व्यक्ती एमसीएची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरत आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ची निवडणूक मंगळवार, दि. 6 जानेवारी रोजी होत असून त्यामध्ये आजीव सदस्यांमध्ये अवैध घुसखोरी घडवून आणली आहे. त्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरणार आहे.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 5 जानेवारीला सुनावणी होणार असून, नवमतदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, आजीव सदस्यांमध्ये सुप्रिया सुळे यांनी मुलगी रेवती सदानंद सुळे आणि सध्याचे एमसीए अध्यक्ष, आमदार रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या अवैध घुसखोरीमुळे आजीव सदस्यांची संख्या 161 वरून थेट 572 वर गेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमसीए सदस्यांमध्ये अवैध घुसखोरी घडवून आणण्यात येणार आहे.

एमसीएच्या निवडणुकीत नामांकन

एमसीए निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी नामांकन यादी जाहीर केली असून, ‌‘अ‌’ गटात सुशील शिवाजी शेवाळे, अभिषेक गणपतराव जोशी, केदार जाधव, रोहित राजेंद्र पवार यांचा समावेश आहे. ‌‘ब‌’ गटात रोहित सत्यवान थोरवे, ‌‘क‌’ गटात शंतनू शरद सुगवेकर, ‌‘ड‌’ गटात निरंजन नरहर गोडबोले, भगवान दत्तात्रय काकड, सुनील संपतलाल मुथा, श्रीकांत जयवंत जाधव, गणेश आनंद चौधरी, राहुल सुभाष कुल, ‌‘ई‌’ गटात संग्राम अरुण जगताप, कुरेशी इरफान अहमद बशीर, राजू तुकाराम काने, समीर अरुण रक्ते, भूपेश रसिकलाल पटेल, अपर्णा किरण सामंत, संभाजी शाहू छत्रपती, चंद्रकांत एन. रेमबेरसू, अजय हेमराज ठक्कर, अजय पंडितराव देशमुख, अजयसिंग रघुनाथसिंग बिसेन या नावांचा समावेश आहे.

नवमतदारांबाबत आज न्यायालयात सुनावणी

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत घडवून आणलेली घुसखोरी पूर्णपणे नियमबाह्य आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज (दि. 5) सुनावणी होणार असून, नवमतदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याचे मत एमसीएच्या माजी अध्यक्षांनी सांगितले आहे.

एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात नवमतदार अपात्रबाबतची उच्च न्यायालयातील याचिकेवर सोमवारी सुनावणी होत आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे मतदार करून घेणे हे दुर्दैवी आहे. असोसिएशनमध्ये 18 घरांतील व्यक्ती, 56 सदस्य व्यावसायिक आणि जवळचे नातेवाईक आणि पक्षाचे 37 व्यक्ती सदस्य करून घेतले आहेत. याबाबत याचिका दाखल केलेली आहे.
केदार जाधव (माजी क्रिकेटपटू)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT