पुणे

पुणे : मावळचा इंद्रायणी तांदूळ मिळणार मार्केट यार्डात!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील अस्सल इंद्रायणी तांदूळ पुणेकर ग्राहकांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. मावळातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन 'मावळचं वैभव' या ब्रॅण्डद्वारे सुवासिक इंद्रायणी तांदूळ आकर्षक पॅकिंगद्वारे 55 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) त्यासाठी विकास सोसायट्यांमार्फत पाच कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कॅश क्रेडिटद्वारे 10 टक्के व्याज दराने सहकाराच्या माध्यमातून उपलब्ध केले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, त्याचे वाटपही पुन्हा शेतकर्‍यांनाच करण्यात येणार असल्याने जिल्हा बँकेने त्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रयोग आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या सोमवारपासून (दि.12) मार्केट यार्डातील भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर पुढील शंभर दिवस इंद्रायणी तांदूळ महोत्सव सुरु राहील. याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष व संचालक रमेश थोरात, मावळ अ‍ॅग्रोचे संस्थापक अध्यक्ष व बँकेचे संचालक माऊली दाभाडे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बाबत दाभाडे म्हणाले, " मावळ तालुक्यातील 55 विकास सोसायट्यांच्या सभासद शेतकर्‍यांकडून भाताची खरेदी प्रति क्विंटलला 2 हजार 400 रुपये या दराने केली जात आहे. आजअखेर 75 लाख रुपयांच्या 350 टनाइतक्या भाताची खरेदी पूर्ण झाली आहे. भाताचा हमीभाव किलोस 20 रुपये 60 पैसे असताना त्यापेक्षा अधिक दराने ही खरेदी केली असून, त्यातून उत्पादित होणार्‍या सुवासिक व अस्सल इंद्रायणी तादूळ 55 रुपये किलो या दराने ग्राहकांना विक्री करण्यात येईल. 5, 10 आणि 30 किलो पॅकिंगमध्ये तो उपलब्ध असेल. मावळात 1250 हेक्टरवर इंद्रायणी भात शेती केली जात असून, त्यातून 3 लाख टनाइतका तांदूळ उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले.

"उत्तम दर्जा असलेला मूळ इंद्रायणी तांदूळ शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन ब्रॅण्डिंगद्वारे ग्राहकांना विक्रीसाठी ठेवण्याच्या प्रकल्पास जिल्हा बँकेने प्रोत्साहन दिले आहे. या पथदर्शी प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर जिल्ह्यातील विकास सोसायट्यांच्या बहुउद्देशीय योजनांसाठी कर्जपुरवठा करण्याचा मानस आहे. अ‍ॅग्रो टुरिझम, गोदामे, कोल्ड स्टेअरेज, रोपवाटिका आदी शेतीपुरक व्यवसायास कर्ज देण्यावर बँकेने भर देण्यास सुरुवात केली आहे.

                    – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT