पौड: पौड (ता. मुळशी) येथे नागेश्वर मंदिरात झालेल्या अन्नापूर्णा देवीच्या मूर्ती विटंबनेप्रकरणी सुनहरी जामा मस्जिदच्या मौलानाचा सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली आहे. वसिम अकरम अब्दुल अझीज शेख (वय 29, रा. सुनहरी जामा मस्जिद, पौड गाव, ता. मुळशी; मूळ रा. काला कच्चू, उदगारा पंचायत, जि. किशनगंज, राज्य बिहार) असे या मौलानाचे नाव आहे.
पौड येथे भरवस्तीत असलेल्या नागेश्वर मंदिरात दि. 2 मे रोजी दुपारी चाँद शेख याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटबंना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ एक दिवस पौड बंद, तर नंतर मुळशी तालुका बंद ठेवण्यात आला होता. (Latest Pune News)
या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चाला पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर झालेल्या सभेत खासदार मेधा कुलकर्णी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शंकर मांडेकर, संग्राम भंडारे, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती.
या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी लक्ष ठेवून होते. दरम्यान, याप्रकरणी मौलाना वसिम अकरम अब्दुल अझीज शेख याचा मूर्ती विटबंनाप्रकरणी गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली.