पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महिलेचा मृत्यू हा मातामृत्यू असल्याने मातामृत्यू अन्वेषण समितीला याबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
महिलेला उपचार मिळण्यास विलंब झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता अहवालात वर्तवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्याचप्रमाणे अतिरक्तस्रावामुळे महिलेला मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू आणि दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा याबाबत चौकशी करण्यासाठी तीन समित्यांचे अहवाल महत्त्वाचे मानले जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि धर्मादाय सहआयुक्त समितीचा अहवाल याआधीच शासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. आता, मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही सादर झाला आहे. त्यामुळे या प्रकरणामधील कारवाईला वेग येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ‘डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर
कोअॅग्युलेशन (डीआयसी) या स्थितीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये शरीरातील रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया अनियमित व अति प्रमाणात सक्रिय होते. त्यामुळे शरीरात अनेक ठिकाणी लहान रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात.
रक्तवाहिन्यांमधील गाठींमुळे रक्तप्रवाह अडतो, त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. यामध्ये तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. वेळेत उपचार न मिळाल्यास मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वैद्यकज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मातामृत्यू अन्वेषण समितीचे काम तथ्य शोधण्याचे
मातृमृत्यू अन्वेषण समिती महिलेचे वय, वैद्यकीय पार्श्वभूमी, वैवाहिक पार्श्वभूमी अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करते. त्यातून मातामृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातो. ही समिती तथ्य शोधणारी समिती आहे, दोष शोधणारी नाही आणि मातृमृत्यू कमी करण्यासाठी एकूण प्रणाली सुधारण्यास मदत करते, असे आरोग्य विभागातील अधिकार्याने सांगितले. हा अहवाल ऑनलाइन पोर्टलमधून शासनाकडे पाठवण्यात आला आहे.