मंचर: पुणे - नाशिक महामार्गाच्या बायपाससाठी भूसंपादन झालेल्या निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील महिलेला वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संचालकांची वारजे, पुणे येथील कार्यालयातील खुर्ची आणि साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आले. अॅड. पल्लवी पोतनीस यांनी ही माहिती दिली.
पुणे- नाशिक महामार्गासाठी निघोटवाडीतील जवळपास 100 शेतकर्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. या बदल्यात शेतकर्यांना मिळालेला मोबदला अल्प असल्याने सीमा सुदाम लेंडवे (रा. निघोटवाडी) यांनी जिल्हा न्यायालयात वाढीव भरपाईसाठी दावा दाखल केला. त्याचा निकाल 30 ऑगस्ट 2022 रोजी लागला.
शेतजमीन हे लेंडवे यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन होते. त्यामुळे जास्तीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्यांनी अॅड. पोतनीस यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. त्याचा निकाल लेंडवे यांच्या बाजूने लागला. त्यांना 1 कोटी 39 लाख 84 हजार रुपये वाढीव मोबदला म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी साहित्य जप्तीची अंमलबजावणी करण्याचा आदेश 23 ऑक्टोबर 2024 रोजी दिला.
न्यायालयाचे बेलिफ यांनी लेंडवे यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 21) जाऊन वॉरन्ट बजावले. या वेळी अधिकार्यांनी पैसे लवकरात लवकर न्यायालयात जमा करू असे मोघम आश्वासन दिले. मात्र, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी न्यायालयात पैसे भरायला तसेच चेक देण्यासाठी तयार नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कायार्लयातील खुर्च्या, संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.