वारजे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समान पाणीपुरवठा योजनेचे काम करताना पाणीपुरवठा जलवाहिनीला धक्का लागल्याने ही वाहिनी फुटली. या जलवाहिनीतून पाण्याची गळती झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाइपलाइनची कामे करताना योग्य ती खबरदारी घेऊन कामे करावीत, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोमवारी मध्यरात्री समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. पाइपलाइनचे क्रॉसिंग करताना पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला धक्का लागून पाण्याची लाइन फुटली होती.
ही लाइन दुरुस्त केल्यानंतर मंगळवारी दि. 22 एप्रिल रोजी ही लाइन पुन्हा फुटल्याने सकाळी दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊन मुख्य रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. वाहणार्या पाण्यामुळे वाहतूक मंदावल्याने वाहन कोंडी देखील निर्माण झाली होती.
पाइपलाइनचे क्रॉसिंग करताना लाइन फुटली होती. रात्री दुरुस्ती देखील केली होती. त्यावरून वाहने गेल्याने लाइनमधून पुन्हा पाण्याची गळती झाली. या रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे हे काम करता आले नाही, सायंकाळी दुरुस्ती करण्यात येणार आहे.- वैशाली जाधव, कनिष्ठ अभियंता, समान पाणीपुरवठा विभाग
सकाळी दहा वाजेपासुन दिवसभर रस्त्यावर पाणी वाहत होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देखील तिरुपतीनगर येथे पाण्याची लाइन फुटली होती. समान पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे दोनवेळा पाण्याची लाइन फुटली आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत आहे.- प्रमोद शिंदे, स्थानिक कार्यकर्ते