शेळगाव : कडबनवाडी(ता.इंदापूर) पठाणवस्ती येथील दादा पठाण यांच्या शेतात अवैधरित्या गोवंश वासरांची कत्तल केलेले चौदाशे किलो गोमांस वालचंदनगर पोलिसांनी जप्त केले असून पोलीस कारवाई मुळे ५५ वासरे ही कत्तल होण्यापासून वाचली असून त्यांना माळशिरस तालुक्यातील मेडद येथील श्रीनाथ गोशाळेत निगा राखण्यासाठी हलवण्यात आले आहेत.
छोटेसे गाव असलेल्या कडबनवाडी या ठिकाणी घडलेल्या प्रकाराने इंदापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोहत्येचे मोठे रॉकेट असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पोलिसांनी कसून चौकशी करून गोहत्येचे रॉकेट शोधून काढावे अशी देखील मागणी होत आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दादा पठाण व इतर सात ते आठ अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. 3) रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, हवालदार गणेश काटकर, वाहन चालक हवालदार किसन बेलदार, पोलीस जवान विक्रम मोरे गस्त घालत असताना चालक पोलीस हवालदार किसन बेलदार यांना पोलीस हवालदार गुलाब पाटील यांच्याकडून कडबनवाडी गावाच्या हद्दीत पठाणवस्ती येथे दादा पठाण यांच्या शेतात वासरांची कत्तल करत आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार गणेश काटकर, वाहन चालक पोलीस हवालदार किसन बेलदार, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम मोरे, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे, पोलीस शिपाई अमोल सोनवणे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
त्या ठिकाणी पोलिसांना महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी MH 42 बी एफ 7478 व दुसरी महिंद्रा कंपनीची नंबर प्लेट नसल्याने चारचाकी पिकअप आढळून आली तसेच चौदाशे किलो कापलेले तसेच तुकडे केलेले गोमांस, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिकचे बॅनर, प्लास्टिकचा टब, स्टीलच्या बादल्या, दोन लोखंडे धारदार चाकू असे मिळून 9 लाख 16 हजार किमतीचे मुद्देमाल त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आले तसेच सिमेंटच्या हौदात वासरांचे हाडे शिंगे व बाजूला रक्तात पडलेले मांस आढळून आले.
घटनास्थळी पशुधन विकास अधिकारी डॉ. रमेश पाटील व डॉ. अरुण ननवरे व डॉ. संतोष भारती यांनी गोमांस चे नमुने पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले.त्यानंतर त्या ठिकाणी कापलेले गोमांस दोन पंचासह जेसीबीच्या साह्याने सुमारे सहा तास माती बुजून नष्ट केले तसेच हौदाच्या बाजूला ओरडण्याचा आवाज येईल म्हणून गाईचे 55 वासरे हे तोंडाला व पायाला बांधलेल्या अवस्थेत मिळून आली. त्या 55 वासरे टेम्पो मध्ये भरून माळशिरस तालुक्यातील मेडद येथील श्रीनाथ गोशाळा या ठिकाणी निगा राखण्यासाठी कायदेशीर कारवाई करून ताब्यात देण्यात आली.
पोलीस जवान आकाश प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कडबनवाडी पठाणवस्ती येथील दादा पठाण व इतर अज्ञात सात ते आठ जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व पशुक्रूरता अधिनियम कलम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलीनाही. कडबनवाडी या छोट्याशा गावामध्ये कधीपासून हे जनावरांचे कत्तल करण्याचा प्रकार सुरू होता व कोण करत होतं याचा उलगडा लवकरच वालचंदनगर पोलीस करतील अशी अपेक्षा शेळगाव व कडबनवाडी परिसरातील नागरिकांना व्यक्त केली आहे. यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कडबनवाडी गोहत्यातील अद्याप आरोपींना अटक नसून लवकरच दादा पठाण सह सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.