बारामती : कार घेण्यासाठी माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी प्रिती प्रशांत खताळ (रा. चिखली सेक्टर, घरकुल निसर्ग हाऊसिंग सोसायटी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सध्या रा. निरावागज, ता. बारामती) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती प्रशांत कृष्णा खताळ, सासू कृष्णा बापू खताळ, नणंद संगीता कृष्णा खताळ व प्रज्ञा सागर देवकाते (सर्व रा. चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादीचा विवाह 21 जानेवारी 2025 रोजी प्रशांत यांच्याशी पार पडला. विवाहामध्ये अडीच तोळे सोने, पती प्रशांत यांना अर्ध्या तोळ्याची अंगठी देण्यात आली होती. तसेच संसारोपयोगी वस्तू, भांडी देण्यात आली होती. 23 जानेवारीपर्यंत फिर्यादी सासरी चिखली येथे राहिल्या. 16 दिवसानंतर त्या निरावागज येथे माहेरी आल्यानंतर त्या पुन्हा जात असताना पतीसाठी माहेरहून पोशाख नेला. तेव्हा पतीने ‘मला काय घ्यायचे असेल तर मी यादी देत जाईन, त्यानुसार वस्तू देत जा, नाही तर तुला नांदवणार नाही,’ अशी धमकी घरच्यांसमोर देत त्यांच्याशी वाद घातला.
सासूने त्यांना ‘तू आम्हाला पसंत नव्हती, पण बळंच केली,’ असे म्हणत शिवीगाळ केली. पतीने ‘तुला नांदायचे असेल तर मला कार घेण्यासाठी 20 लाख रुपये आण,’ अशी मागणी वारंवार केली. या कारणावरून खुर्ची फेकून मारणे, शिवीगाळ, दमदाटी करणे असे प्रकार करण्यात आले. माहेरी हा त्रास सांगितल्यानंतर त्यांनी सासरच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘तुमची मुलगी नांदवायची असेल तर आम्ही सांगू ते दिलेच पाहिजे,’ अशी मागणी सासरच्यांनी कायम ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.