शंकर कवडे
पुणे : ‘एकमेकांशिवाय राहवत नाही, पण एकत्र राहणंही अवघड’ या भावनेतून अनेक जोडपी आज नव्या अटी-शर्तींवर आपला संसार पुन्हा फुलविताना दिसत आहेत. वैचारिक मतभेद, वेगवेगळ्या जीवनशैली, व्यसनाधीनता, एकत्र कुटुंबातील तणाव किंवा परस्परांवरील संशय अशा अनेक कारणांवरून दाम्पत्यांत वाद होतात. त्यामुळे पत्नी माहेरी निघून जाते किंवा पती तिला घराबाहेर काढतो. अशा परिस्थितीत वाद किंवा राग शांत झाल्यानंतर पत्नी नांदायला येत नसेल किंवा पती नांदायला घेऊन जात नसेल तर साथीदार न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो. त्यानंतर, पुन्हा एकत्र येताना मात्र जोडपी विविध अटी अन् शर्तींचा आधार घेत असल्याचे चित्र कौटुंबिक न्यायालयात दिसून येत आहे.(Latest Pune News)
भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेली पत्नी किंवा पत्नीला नांदविण्यास तयार नसलेला पती अशा दोन्ही परिस्थितीत साथीदार न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. हिंदू विवाह कायद्यातील कलम 9 नुसार अशा जोडप्यांना पुन्हा एकत्र येण्याची कायदेशीर संधी मिळते. पती अथवा पत्नीने न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्या दोघांचे समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाते.
या वेळी, त्यांकडून एकमेकांसमोर अटी-शर्ती ठेवल्या जातात. त्या मंजूर झाल्यानंतर न्यायालय त्या जोडप्यांच्या एकत्रित येण्याच्या आदेशात या अटी-शर्तींचा उल्लेख करते. तसेच न्यायालयास योग्य वाटतील, अशा बाबींचा देखील त्यात उल्लेख असतो. दाम्पत्यांना अटी-शर्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर न्यायालयाचा शिक्कामोर्तब होतो अन् पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होते, असे ॲड. ऋतुराज पासलकर यांनी सांगितले.
माहेरी गेलेली पत्नी परत येण्यास तयार असली, तरी ती अट घालते ज्यामध्ये आपण दोघेच वेगळे राहू, इतर कुटुंबीयांसोबत नाही अशी मागणी अनेक प्रकरणांत दिसून येते. प्रत्यक्षात प्रत्येक प्रकरणातील अटी व परिस्थिती वेगवेगळ्या असतात. जोडप्यातील मतभेदांचे स्वरूप काय आहे, हे समजून घेत समुपदेशनानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. तसेच, पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असणे, पतीकडून पत्नीवर अत्याचार होणे, सासरी होणारा त्रास, एखाद्या जोडीदाराने धर्मांतर करणे, मानसिक आजाराने ग्रस्त असणे किंवा कोणत्याही वैध कारणाविना संसार त्यागणे अशा परिस्थितींमध्ये अर्ज नामंजूर होण्याची शक्यता अधिक असल्याचे जिल्हा न्यायालयात वकिली करणारे ॲड. अमित राठी यांनी सांगितले.
बहुतांश प्रकरणात अटी-शर्ती म्हणजे नाते तुटण्याचे कारण मानले जाते. परंतु, आजची जोडपी त्यांच्याच माध्यमातून नातं जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तडजोड नव्हे, तर नव्या नियमांच्या चौकटीतून पुन्हा एकदा संसार उजळविण्याचा हा प्रयत्न आधुनिक काळातील नवा विवाहसंस्कार ठरत आहे.ॲड. संग्राम जाधव, कौटुंबिक न्यायालयातील वकील.
अर्ज दाखल झाल्यानंतर समुपदेशनाद्वारे दोघांमध्ये संवाद घडवून आणला जातो. न्यायालयाचा उद्देश फक्त एकत्र राहाणे हा नसून, संसाराचा धागा टिकवणे हा असतो. काही जोडपी स्वतंत्र राहूनही आपला संसार टिकवतात. त्यांच्या अटी-शर्ती न्यायालय आदेशात नमूद केल्या जातात.ॲड. सिद्धार्थ अगरवाल, कौटुंबिक व दिवाणी वकील