पुणे

सांगवी : बाजार समितीच्या तिकिटावरून शिरवलीकर नाराज!

अमृता चौगुले

सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील शिरवली गावाला राजकीय क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे गाव कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. परंतु, विविध संस्थांच्या निवडणुकीत कायम या गावाला दुजाभाव मिळत असल्याची भावना शिरवलीकरांना स्वस्थ बसू देत नाही. मात्र, बाजूच्या गावांना पदांचा व इतर कामांचा भरपूर मलिदा वाटला जात असतानाच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिरवली गावाला तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतितटीची झाली. त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जे गाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मताधिक्य देईल, त्या गावाला कारखाना किंवा इतर संस्थांवर संधी देणार असल्याचे जाहीर सांगितले होते. त्याप्रमाणे शिरवलीकरांनी कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी 80 टक्के मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षाचे एकनिष्ठ काम करूनही कारखान्यासह इतर संस्थांवर संधी मिळत नाही. मात्र, शेजारच्या गावांमध्ये अनेक पदे मलिदा वाटल्यासारखी वाटत असल्याची माहिती सचिन पोंदकुले व मेघश्याम पोंदकुले यांनी दिली.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिरवली हे मतदानाच्या टक्केवारीत नेहमीच अग्रेसर असते. बाजूच्या गावांमध्ये विरोधात मतदान होत असतानाही त्याच गावांना पदांचा व इतर कामांचा मलिदा वाटला जात असतानाच 'आम्ही तरी कशासाठी प्रामाणिकपणे काम करायचे?' असा सूर शिरवलीकरांनी आळवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना मोठ्या प्रमाणात मलिदा वाटला जात आहे, त्यांच्याकडूनच मतदान करून घ्या, अशा संतप्त भावना शिरवलीकरांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

SCROLL FOR NEXT