पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी केली आहे. त्या दृष्टीने सोमवारी (दि.14) नऊ बाजार समित्यांच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या प्रारूप मतदार यादीवर 23 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांनी दिली आहे.
मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होण्यामध्ये प्रामुख्याने पुरंदर, भोर, दौंड, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, बारामती, जुन्नर या 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. या समित्यांची प्रारूप मतदार यादी ही हरकती व आक्षेप मागविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय (ग्रामीण), संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, संबंधित तालुक्याच्या सहकारी संस्थांचे उप, सहायक निबंधक, यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व सुधारणा अधिसूचना 16 डिसेंबर 2017 व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 अन्वये जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात मागविल्या आहेत.
संबंधित बाजार समितीच्या सभासदांनी दिलेल्या तारखांनुसार प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती) तथा जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) यांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत, पहिला मजला, बी. जे. रोड, पुणे – 1 या कार्यालयात वेळेत दाखल करावेत, असेही सोबले यांनी सांगितले.
असा असेल प्रारूप यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम
घोषित 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. प्रारूप मतदार यादीवरील हरकती व आक्षेप 14 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. त्यावर जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडे 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडून अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी ही बाजार समिती कार्यालय, तालुका सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सोबले यांनी सांगितले.