पुणे

Pune News : पुरंदरमध्ये झेंडूचे उत्पादन घटणार

अमृता चौगुले

वाल्हे : दरवर्षी पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, या वर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिशय अल्प प्रमाणात पडला. परिणामी, या वर्षी मागील वर्षापेक्षा तब्बल 139 हेक्टर हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड घटली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुरंदर तालुक्यात झेंडूचे उत्पादन अल्प प्रमाणात येणार असून, याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
या वर्षी पुरंदर तालुक्यातील नदी, ओढे-नाले, बंधारे, तलाव अद्याप कोरडेठाक आहेत. पावसाने या भागात पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी झेंडू पिकाचे उत्पादन घेतले नाही. ज्यांनी झेंडू पिकाची लागवड केली, त्यामधील अनेकांची झाडे पाण्याअभावी करपून गेली. काही शेतकर्‍यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून झेंडू जगविला, त्यांना झेंडूंच्या फूल विक्रीतून दोन पैशांचे उत्पादन मिळेल, अशी आशा आता आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला असून, यामुळे अनेकांचे झेंडू पीकच राहणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दसरा-दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकरीवर्गासमोर पडला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 139 हेक्टर क्षेत्रांमध्ये झेंडूची लागवड कमी झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT