पुणे

पुणे : मराठीचा पेपर सोप्पाच! दहावीच्या परीक्षेला राज्यात उत्साहात सुरुवात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे औक्षण, परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी आणि लागलेल्या रांगा, परीक्षा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांची अभ्यासाची उजळणी आणि प्रत्यक्ष पेपर लिहिण्यास केलेली सुरुवात… शेवटच्या घंटेपर्यंत सुरू असलेले पेपरचे लिखाण, पोलिसांचा परीक्षा केंद्रावर असलेला बंदोबस्त, अशा वातावरणात राज्य मंडळाची दहावीची परीक्षा गुरुवारी सुरू झाली. 'मराठीचा पेपर सोप्पा गेला', असा अनुभव विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यावर आवर्जून सांगितला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यातील 23 हजार 10 शाळांमधून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुणे विभागीय मंडळातून 2 लाख 68 हजार 200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षेतील पहिला पेपर हा मराठी विषयाचा होता.

सकाळी दहापासूनच केंद्रावर विद्यार्थी पालकांसमवेत हजर झाले. शहरातील काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या. तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. दरम्यान, परीक्षा केंद्राबाहेर अनेक पालक हे मुलांचा पेपर संपेपर्यंत थांबल्याचे दिसून आले.

9 कॉपीबहाद्दर सापडले
दहावीचा पहिलाच पेपर होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी, कन्नड, तमिळ, तेलगु, सिंधी, बंगाली या विषयांची पहिल्या सत्रात परीक्षा दिली. पंरतु, यातदेखील 9 कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यातील सर्वाधिक 5 कॉपीबहाद्दर पुण्यात पकडले. नागपूर-2, अमरावती-1, नाशिक-1 या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मराठीचा पेपर होता. त्यामुळे दडपण नव्हते, तसा पेपर खूपच सोपा आल्यामुळे पेपर सोडवताना आनंद वाटला.

                            राणी चव्हाण, विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड

मराठीचा पेपर असल्यामुळे काळजी नव्हती. पेपर सोपा होता, त्यामुळे सोडविण्यास वेळ मिळाला. आता 6 तारखेला इंग्रजीचा पेपर आहे. त्यासाठी तीन दिवसांची सुटी आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करणार आहे.

                           भूमिका राजवीर, विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड

गादी कारखान्यात कामाला जाते. परंतु, मुलीची दहावीची परीक्षा असल्यामुळे आले. तिने चांगले शिकावे हीच इच्छा आहे. त्यामुळे तिचा घरी अभ्यासदेखील घेते.

                                                  – शालिनी राजवीर, पालक

मराठीचा पेपर सोपा होता. दहावीच्या परीक्षेसाठी रोज पहाटे उठून अभ्यास करत आहे. त्यामुळे पेपर सोपे जातील. वर्गात सोडताना चेकींग केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करता येत नाही.
                              – अथर्व इंगळे, विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड

SCROLL FOR NEXT