पुणे

पुणे : अमराठीही गिरवताहेत मराठीचे धडे; परराज्यांतील नागरिक शिकताहेत मराठी

अमृता चौगुले

सुवर्णा चव्हाण

पुणे : नोकरीनिमित्त मध्य प्रदेशमधून पुण्यात आलेल्या विशाल एन. याला मराठीची गोडी पहिल्यापासूनच होती अन् त्यात नोकरीसाठी मराठी आवश्यक असल्याने त्याने मराठीचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले अन् एका वर्गात मराठी शिकण्यास सुरुवात केली. बघता बघता तो अस्खलित मराठी शिकला अन् आता मराठीत लेखनही करू लागला आहे. विशालप्रमाणे आज कित्येक अमराठीभाषक मराठीचे धडे गिरवत असून, रोजच्या व्यवहारातही ते मराठी बोलू लागले आहेत.

सध्या पुण्यात नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त अमराठीभाषक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मायबोली असलेल्या मराठीची गोडी त्यांच्यातही आहे. त्यामुळे काही जण प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊन मराठीचे शिक्षण घेत असून, विविध संस्थांद्वारे असे प्रशिक्षणवर्ग घेतले जात आहेत.

याविषयी मराठी भाषा शिकविणार्‍या कल्याणी झा म्हणाल्या, 'मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाकडून परकीय भाषा म्हणून मराठी इतर भाषिकांनाही शिकता यावी, याद़ृष्टीने खास पुस्तकांसह अभ्यासक्रम तयार केला असून, अभ्यासक्रमाचे नाव 'मायमराठी' असे आहे. तो विद्यापीठातून ऑनलाइन चालणारा कोर्स असून, त्यामध्ये परकीय विद्यार्थ्यांसह भारतातील अमराठीभाषकही मराठी शिकत आहेत. त्यांना मी मराठी शिकवत आहे तसेच मी काही संस्थांमध्येही मराठी शिकवते.'

सायली दिवाकर म्हणाल्या, 'मराठीतील व्याकरण असो वा मराठी बोलण्याचा लहेजा, असे सारे काही त्यांना आम्ही शिकवत आहोत. खासकरून त्यात महाविद्यालयीन तरुणांची संख्या अधिक आहे. मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी शिकवते. ते मोठ्या मेहनतीने मराठीतील व्याकरणापासून ते संभाषणापर्यंत कौशल्य आत्मसात करीत आहेत.'

अमराठीभाषक नोकरदार तरुण, व्यावसायिक, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे तरुण आणि महाविद्यालयीन तरुण मराठीचे धडे गिरवत आहेत. ज्यांना महाराष्ट्रात राहायचे आहे आणि करिअर करायचे आहे, ते खासकरून मराठीचे शिक्षण आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतील लोकांना मी मराठी शिकवते. लेखन, संभाषण, मराठीचे ऐकण्याचे कौशल्य, वाचन आणि मराठीचे उच्चार, अशा पद्धतीने त्यांना मराठी शिकवली जाते.
                                       डॉ. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी, मराठी भाषातज्ज्ञ

नोकरीनिमित्त मी पुण्यात राहत असून, सध्या रोजच्या व्यवहारात मराठी शिकण्याची गरज असल्याने तसेच मराठी भाषा शिकण्याची इच्छा असल्याने मी मराठी शिकत आहे. आता मराठी वाचायला आणि बोलायला शिकलो आहे.

                                                    मयंक शहा, मध्य प्रदेश

SCROLL FOR NEXT