Taxi Driver Pudhari
पुणे

Maharashtra Marathi Mandatory Taxi Drivers: रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य; निर्णयावर ठाम राहा – शिवतारे

भाषेच्या मुद्द्यावर सरकारने दबाव झुगारावा; अस्मितेचा प्रश्न असल्याचे मत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय हा केवळ भाषेचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अलिकडील घडामोडींमध्ये काही ठिकाणी या निर्णयाला विरोध होत असल्याचे दिसून येते, अशा परिस्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन हा निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये, अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रहिताच्या प्रश्नावर स्पष्ट व ठोस भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय राजकारणासोबतच प्रांतीय अस्मिता जपणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. शिंदे यांनी या विषयावर स्पष्ट वर्ग घेऊन मराठी माणसांच्या भावना जपाव्यात, असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी झालेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हे आजच्या नेतृत्वाचे कर्तव्य आहे, त्यामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य व स्वागतार्ह आहे.

आज महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय नागरिक उपयोजकेसाठी येतात, हे स्वागतार्ह आहे. मात्र, येथे राहून व्यवसाय करताना मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे, ही त्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या भूमिकेवर ठाम राहावे लागणार आहे, असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही त्यांनी हे पत्र पाठविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT