सुवर्णा चव्हाण
पुणे: 14 मार्च 2024 रोजी मराठी भाषा धोरणाच्या मंजुरीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला खरा. परंतु, याला दहा महिने उलटूनही मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीचा मराठी भाषा विभागाला विसर पडला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरण गेले कुठे? असा सवाल साहित्यिकांनी आणि मराठी भाषाप्रेमींनी उपस्थित केला आहे.
मराठीला ज्ञानभाषा, रोजगाराची, माहिती तंत्रज्ञानाची भाषा, संवाद, संपर्क आणि अभिव्यक्तीची भाषा बनविण्यासाठी आखण्यात आलेल्या या धोरणाची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी मागणी साहित्यिकांकडून होत आहे.
मराठी भाषेसाठीच्या मराठी भाषा धोरणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील समितीने संशोधन आणि चर्चेतून मराठी भाषा धोरणाचा अंतिम अहवाल मागील वर्षी तयार करून मराठी भाषा विभागासमोर सादर केला.
धोरण तयार करण्यासाठी समितीने मोठी मेहनत घेतली. त्यांनी सादर केलेल्या अंतिम अहवालानंतर मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
त्यानंतर लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. दरम्यान, समितीकडून धोरणाच्या अंमलबजावणीचा पाठपुरावाही करण्यात आला. पण, अंमलबजावणीला मुहूर्त मिळाला नाही. आता जानेवारी महिना संपल आला असला तरी धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण, मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त का लागेना? असा प्रश्न साहित्यिक, मराठी भाषाप्रेमी विचारत आहेत.
मराठी भाषा धोरणातील शिफारशी
25 वर्षांत मराठी ही ज्ञान आणि रोजगारस्नेही भाषा करणे.
प्रशासनात व्यवहारासाठी मराठी भाषेचा पूर्णपणे वापर करणे.
मराठी ही माहिती तंत्रज्ञानाची भाषा, राज्यातील सर्वांची संवाद, संपर्क आणि अभिव्यक्तीची भाषा व्हावी, यादृष्टीने उपाययोजना करणे.
मराठीच्या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करणे.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना राज्यात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी मदत करणे.
मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.
मराठी भाषा, साहित्य, कलासंस्कृतीचा, राज्य, देश आणि जगभरात प्रसार व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न सर्व विभागांमार्फत करणे.
ग्रंथालय चळवळ बळकट करणे. ग्रंथालय धोरण आखणे. वाचनसंस्कृती विकसित करणे.
मोडी लिपीचे जतन आणि संवर्धन करणे.