पुणे

‘मराठा तरुणांनी उद्योगाकडे वळावे’; संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात वक्त्यांचा सूर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपण आरक्षणाचा लढा देत आहोत, ते करत असतानाच मराठा तरुणांनी आता उद्योगक्षेत्राकडे वळण्याची गरज आहे, असा सूर संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांकडून उमटला. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शाहू महाराज छत्रपती, खा. श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, खा. वंदना चव्हाण उपस्थित होते. या वेळी डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार यांचा 'विश्वभूषण जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.

मुलींना उच्च शिक्षण द्या : शरद पवार
शरद पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मराठा समाजातील युवकांनी आता उद्योगाकडे वळले पाहिजे. आज या ठिकाणी एक चांगले चर्चासत्र झाले. 'आरक्षणाशिवाय उद्योगाकडे' असा तो विषय होता. संभाजी ब्रिगेडने हे चांगले काम हाती घेतले आहे. मला देश-विदेशात अनेक मराठा तरुण-तरुणी भेटतात, तेव्हा अभिमान वाटतो. मराठा समाजातील मुलींनादेखील चांगले शिक्षण दिले पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

'संविधान बचाव'साठी लढा देऊ : शाहू महाराज छत्रपती
शाहू महाराज छत्रपती म्हणाले, 'आरक्षण मिळविण्यासाठी आपण लढा देत आहोत, ते सुरूच ठेवू. ते आज मिळाले नसले, तरी आपण पुढे जातच राहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बाजूला सारून काही करता येईल का? याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे तसे होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे.

मुलीला रुखवतात पुस्तके द्या : डॉ. जयसिंगराव पवार
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, मला माफ करा, एक गोष्ट स्पष्ट सांगतो की, मराठा समाजातील लग्नात लाखो रुपये रुखवतावर खर्च केले जात आहेत. ते थांबवा, मुलीला त्या बदल्यात रुखवतात कपाटभर पुस्तके द्या म्हणजे पुढची पिढी घडेल. या वेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. म. देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे यांचेदेखील भाषण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT