पुणे

Maratha Reservation : 75 टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

Laxman Dhenge

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार, मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षकांमार्फत सुरू असलेल्या मोबाईल आधारित सर्वेक्षणांतर्गत सुमारे 75 टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण कोणत्याही कारणाने झाले नसेल तर त्यांना शुक्रवारी (दि. 2) अखेरची एक संधी देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यकक्षेत सुमारे 45 हजारांवर निवासी कुटुंबीय असून, लोकसंख्या सव्वालाखाच्या आसपास आहे. नगर परिषदेचे 40 कर्मचारी आणि 25 शिक्षकांनी गेल्या सात दिवसांत घरभेटी देत अखंडपणे सर्वेक्षणाचे काम केले आहे. असे असूनही काही घरे कुलूपबंद आढळल्याने किंवा योग्य माहिती सांगू शकणारी कुटुंबप्रमुख व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेल्याने सर्वेक्षण होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेऊन, आज गुरुवारी मुख्याधिकारी पाटील यांनी नोंदी न झालेल्यांसाठी नगरपालिकेच्या विविध अधिकार्‍यांशी थेट संपर्क साधून ती करून घेण्याची व्यवस्था केली आहे. मुख्याधिकारी म्हणाले, की नजरचुकीने ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण राहिले आहे, त्यांनी तत्काळ नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांशी 2 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपापले सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT