पुणे

Maratha Reservation : पिंपरीत मोर्चा अन् कडकडीत बंद

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा (पिंपरी-चिंचवड शहर) आणि सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरीगाव ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समर्थक यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणेआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय अशा विविध घोषणा देत हातामध्ये भगवा ध्वज घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. पिंपरीगाव येथे महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. डिलक्स चौक-रिव्हर रस्ता-पिंपरी बाजारपेठ-शगुन चौक-पिंपरी उड्डाण पूल-गोकुळ हॉटेलजवळून पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप झाला. त्यानंतर येथे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कामगार नेते काशिनाथ नखाते, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी नगरसेवक नाना काटे, राहुल कलाटे, मारुती भापकर, सुजाता पालांडे तसेच प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे, मराठा क्रांती मोर्चाचे जीवन बोराडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर व अन्य विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सामील झाले होते. मराठा क्रांती मोर्चा (पिंपरी-चिंचवड) आणि सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांच्याकडे सुपूर्द केले.

सर्व व्यवहार बंद

शहरातील विविध भागांमध्ये दुकाने, बाजारपेठा, काही भागांतील भाजी मंडईदेखील बंद होत्या. त्याशिवाय, भोसरी, चिंचवड आणि पिंपरी एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजकांनी देखील बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुस्लिम समाज बांधवांचाही आंदोलनात सहभाग होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT