राहू(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी समाजबांधव एकवटले असून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देवकरवाडी, कोरेगाव भिवर या गावातील सकल मराठा समाजाकडून देखील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कानगाव येथील ग्रामपंचायत सदस्यानी राजीनामा दिल्यानंतर देवकरवाडी व कोरेगाव भिवर येथील ग्रामस्थांनीही सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे मराठा आंदोलनाची धग हळूहळू सर्वत्र पसरू लागलेली आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी देवकरवाडी तसेच कोरेगाव भिवर येथील मराठा समाज बांधवांनीदेखील मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करत त्याबाबतचे फलक लावले आहेत. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास नेतेमंडळी जबाबदार आहेत. निवडणुकीत मतदानासाठी आरक्षणाचे आश्वासन देऊन मराठा समाजाला झुलवत ठेवणारे नेते आरक्षण न मिळण्याला सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.