पुणे: छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये श्रीसंभाजी महाराजांच्या खोट्या प्रसंगांना दाखविण्यात आले असून, त्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) पुण्यात घेण्यात आली.
यासाठी लाल महाल परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांच्यासह सचिन आडेकर, अनिल ताडगे, रेखा कोंडे, मयूर कोंडे आदी उपस्थित होते. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती श्रीसंभाजी महाराजांची, तर रश्मिका मंदानाने राणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
छावा चित्रपटातील छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या जीवनातील चुकीच्या आणि खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. विकी कौशल यांच्या सिनेमात छत्रपती श्रीसंभाजी महाराज आणि येसूबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आले आहेत. जगाच्या पाठीवर छत्रपती श्रीशिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचलेली नाही. अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना नाचताना दाखवले आहेत, यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला आहे.