मंचर: आंबेगाव तालुक्याच्या घोडेगाव येथील तहसील कार्यालयात महिनाभरापासून सातबारा व फेरफार उतारे मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. ही समस्या सुटली नसल्याने नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
घोडेगाव तहसील कार्यालयातील जुने फेरफार व सातबारा सातत्याने हाताळल्याने जीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्या दप्तराचे तुकडे निघत असल्याने नागरिकांना रेकॉर्ड मिळण्यास बऱ्याचदा अडचण होते. हे लक्षात घेऊन शासनाने तालुका स्तरावरील कार्यालयातील सगळे दप्तर स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना फेरफार व सातबारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. (Latest Pune News)
यासाठी दप्तर स्कॅनिंगचे काम तहसीलदार कार्यालयात सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वी मिळणारे फेरफार व सातबारा हे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जुन्या नोंदी महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरत आहेत.
मात्र कामामुळे उतारे मिळत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसह मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय पाहता तात्पुरत्या स्वरूपात एक खिडकी योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने सातबारा व फेरफार देण्यात यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव बाणखेले यांनी केली आहे.
शासनाने तालुकास्तरावरील कार्यालयातील सगळे दप्तर स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नागरिकांना फेरफार व सातबारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. थोडा विलंब लागत असला तरी कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल.- संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव तालुका