पुणे: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 70 दिवस उलटून गेले तरी मारेकरी सापडत नाहीत. तसेच अटक आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असून याप्रकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी वेस्टईन हॉटेल येथे आलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी आत जाऊ दिले नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (दि. 22) कोरेगाव पार्क येथील वेस्टईन हॉटेलमध्ये पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी आले होते. दरम्यान, बैठक सुरू असतानाच मराठा आंदोलक हॉटेलच्या गेटवर दाखल झाले. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे.
तसेच फरार आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले असून, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविले. आंदोलनकर्ते आक्रमक होताच पोलिसांनी गाडीमध्ये बसवून त्यांना मुंढवा पोलिस ठाण्यात नेले. त्याठिकाणी काही वेळानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.