पुणे: शहरात सतत गुन्हे घडणार्या दोन हजार 576 हॉटस्पॉटचे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मॅपिंग करण्यात आले आहे. परिमंडल पाच आणि तीन मधील पोलिस ठाणांच्या हद्दीत असे सर्वाधिक हॉटस्पॉट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी कॉप्स 24 च्या माध्यमातून दिवस आणि रात्री, अशा दोन सत्रांत पाचवेळा गस्त घातली जात असून, त्याची माय सेफ आणि डायल 112 च्या एमडीटीमध्ये नोंदणी केली जाते आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेकडून तब्बल 30 हजार गुन्हेगारांचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे. हा सर्व डेटा पुणे पोलिसांनी मायसेफ क्राईम मोड्यूलवर जमा केला आहे. त्यामध्ये गुन्हेगाराचे पूर्व रेकॉर्ड, तो राहत असलेले वास्तव्याचे ठिकाण नोंदविण्यात आले आहे.
स्थानिक पोलिस ठाणे आणि कॉप्स 24 च्या बीट मार्शलनी हे गुन्हेगार त्यांच्या वर्गवारीनुसार कितीवेळा तपासले, याची सर्व माहिती अद्ययावत केली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही उपक्रमांवर गुन्हे शाखेकडून लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या दिवसभरातील कामाचा लेखाजोखा घेतला जात आहे.
याबाबत बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. स्ट्रीट क्राइम रोखण्यात पोलिसांना बहुतांश यश आले आहे. खून, खुनाचे प्रयत्न या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
2025 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत खुनाच्या घटनांचे प्रमाण साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कॉप्स 24 आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून शहरात पोलिसांचा प्रेझेन्स वाढविण्यात येत आहे. तसेच गुन्हेगारांवर सर्व्हिलन्स ठेवला जातोय. झोपडपट्टीतील नशा करणार्यांवर पोलिसांची नजर असल्यामुळे ते प्रमाण कमी होताना दिसते आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सतत गुन्हे घडणार्या ठिकाणी शोधून त्याचे मॅपिंग करण्यात आले आहे. दिवस आणि रात्री अशा दोन सत्रांत पाचपेक्षा अधिक वेळा त्या ठिकाणांना पोलिसांकडून भेट दिली जात आहे. पोलिस त्या ठिकाणी कितीवेळा गेले, याची नोंद प्रत्येकवेळी ठेवली जाते. बहुतांश पोलिस ठाण्यातील गुन्हेगारी हॉटस्पॉटवर बीट मार्शल शंभर टक्के पोहचत आहेत. तर काही पोलिस ठाण्यांतील हॉटस्पॉट रेड झोनमध्येसुद्धा आहेत. तेथील गस्त जास्तीत जास्त प्रमाणात कशी वाढविता येईल, याबाबत काम करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसांचा रस्त्यावरील वावर वाढल्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश निर्माण होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईवर भर, स्थानिक पोलिस आणि कॉप्स 24 च्या माध्यमातून गस्त वाढविण्यात आली. सतत गुन्हे घडणार्या अडीच हजार ठिकाणांचे मॅपिंग करण्यात आले. त्याचबरोबर 30 हजार गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसिंग राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर