पुणे

पुणे : आर्थिक वर्षअखेरीस अनेक प्रकल्प कागदावरच

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे : महापालिका निवडणुका पुढे गेल्यानंतर गेले वर्षभर आयुक्तांची प्रशासकीय राजवट असतानाही अनेक प्रकल्प हे कागदावरच राहिले. तर अनेक कामे अर्धवट स्वरूपात असल्याचे आज स्पष्ट झाले. नगरसेवकांचा वर्षभर कोणताही हस्तक्षेप नसताना प्रशासनाला त्यांची ठरवलेली कामेदेखील मार्गी लावता आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अधिक काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गतवर्षी 15 मार्च रोजी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनीच मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी गेले वर्षभर झाली. राजकीय हस्तक्षेप अत्यल्प असतानादेखील महापालिकेच्या खातेप्रमुखांनी निश्चित केलेली कामे वर्षभरात पूर्ण होऊ शकली नाहीत तसेच काही कामे सुरूही होऊ शकली नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक करताना आयुक्तांना आणखी योग्य आराखडा करण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त शुक्रवारी (24 मार्च) 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक जाहीर करत आहेत. अशा वेळी गेल्या अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या विविध प्रमुख प्रकल्पांचा आढावा दै. 'पुढारी'ने घेतला.

अंदाजपत्रकातील जमा, खर्च
अंदाजपत्रकातील जमेचा अंदाज – 8592 कोटी.
डिसेंबर अखेरचे उत्पन्न – 5262 कोटी
डिसेंबर अखेरचा खर्च – 3863 कोटी
महसुली खर्च ः 3158 कोटी 52 लाख
भांडवली खर्च ः 705 कोटी 20 लाख

हे प्रकल्प झाले सुरू

जायका प्रकल्प
नदी सुशोभीकरण
समाविष्ट गावे मलनिस्सारण
जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरण
उरुळी देवाची व फुरसुंगी टी. पी. स्कीम
नवीन समाविष्ट गावांसाठी रस्ते, पाणी, ड्रेनेज

हे प्रकल्प अर्धवटच
कात्रज-कोंढवा रस्ता
शिवणे – खराडी रस्ता
समान पाणीपुरवठा योजना
विविध ठिकाणची 6 उद्याने

पालिकेचे अंदाजपत्रक आज

महापालिकेचे सन 2023-24 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे शुक्रवारी (दि. 24) सादर करणार आहेत. नगरसेवक नसताना हे अंदाजपत्रक सादर होत असल्याने आयुक्त वास्तववादी अंदाजपत्रक सादर करणार, की स्थायी समितीप्रमाणे फुगवणार याबाबत उत्सुकता आहे. दरवर्षी महापालिकेचे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाते. मात्र, जी-20 परिषद आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 2023-24 चे अंदाजपत्रक मार्चमध्ये मांडले जाणार आहे.

महापालिकेचे 2022-23 चे अंदाजपत्रक 8 हजार 592 कोटींचे होते. त्यामध्ये 4 हजार 881 कोटींची महसुली कामे, तर 3 हजार 710 कोटी भांडवली कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी प्रशासक म्हणून आयुक्तांनीच वर्षभर केली. त्यानंतर आता दुसरे अंदाजपत्रक मांडण्याची संधी महापालिका आयुक्तांना मिळत आहे. या अंदाजपत्रकात आयुक्त नवीन कोणत्या प्रकल्पांचा समावेश करणार, की सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

SCROLL FOR NEXT