Death Pudhari
पुणे

Dumper Accident Death Case: मांजरी-केशवनगर मृत्यू प्रकरणाचा उलगडा; डंपरच्या धडकेत मृत्यू

70 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात; खूनाचा संशय फोल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी-केशवनगर परिसरात संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, हा खून नसून डंपरच्या धडकेत झालेला अपघाती मृत्यू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तीन दिवसांत 70 सीसीटीव्ही फुटेज तपासून डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिपन्ना पत्याप्पा राठोड (वय 41, रा. मोमीननगर, मांजरी) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मांजरी-केशवनगर येथील रणजित लोणकर यांच्या मोकळ्या जागेत एका 41 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा संशय व्यक्त केला होता.

याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यातून मृत व्यक्तीची ओळख पटली. राठोडला दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रांकडून त्याविषयीची सर्व माहिती गोळा केली. तांत्रिक विश्लेषणात पहाटे एक डंपर त्या ठिकाणी जाऊन परतल्याचे सीसीटीव्हीत आढळले.

तब्बल 70 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित डंपर हा बी. टी. कवडे रोड परिसरातून माती व राडारोडा टाकण्यासाठी त्या भागात येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, राठोड हा दारूच्या नशेत रस्त्याकडेला झोपला होता. त्या वेळी डंपर चालकाला तो दिसला नाही आणि डंपरची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालकाने पळ काढला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनीक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिगूवाले, संजय माळी, कल्पना सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलिस अंमलदार कविराज पाटील, रोहिदास उगले, राहुल मोरे, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, विशाल बनकर, रूपेश तोडेकर, सचिन बोराटे, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT