ओतूर: निसर्गाने वारेमाप सौंदर्याची उधळण केलेल्या व ओतूरच्या श्री क्षेत्र कपर्दिकेश्वर भव्य देवालयाच्या स्थानावर विलोभनीयरीत्या चंद्रकार वळण घेऊन बारमाही वाहणार्या मांडवी नदीला यंदाच्या कडक उन्हाळ्यात बकालपणा आलेला दिसत आहे. सध्या नदीला शेवाळयुक्त पाण्याच्या डबक्यांनी बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. याच पाण्याच्या दुर्गंधीने स्थानिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मांडवी नदीवर चिल्हेवाडी धरण प्रकल्प आहे. पूर्वी ही नदी बाराही महिने वाहत असल्याने आजूबाजूच्या गावांचा परिसर ’सुजलाम सुफलाम’ पहायला मिळत असे, या नदीमुळे या भागातील आर्थिक सुबत्तादेखील टिकून राहात असे. (latest pune news)
नदीमुळे दुतर्फा नटलेली वनराई, पशु-पक्ष्यांचा चिवचिवाट, प्राणिमात्रांचा सदोदित वावर, शेतकर्यांच्या पशुधनाची नदीवर दिवसभराची ये-जा, उकाड्याने हैराण झालेल्या बालचमूंसह तासन् तास नदीत पोहण्याची मजा नागरिक घेत असत.
मात्र आजच्या घडीला उन्हाळ्यामुळे मांडवी नदी आटू लागली आहे. आहे ते पाणी डबक्यातआहे. ते देखील शेवाळयुक्त व दुर्गंधी पसरवणारे दूषित झाले आहे. परिणामी नागरिकांचे नदीवर फेरफटका मारणे बंद झाले आहे, तर नदीचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. अनेक विहिरी, कूपनलिका शेवटच्या घटका मोजू लागल्या आहेत.
यंदा सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्या मांडवी नदीला कित्येकदा पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचा इतिहास आहे.
या नदीमुळे ओतूर आणि परिसराला पाणी टंचाईच्या झळा अद्यापपर्यंत कधीही सोसाव्या लागल्या नसल्या तरी भविष्यात पाणीटंचाई संभवते. ती टाळण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना आखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत प्रशासनाने मानसी वृक्षारोपणाची सक्ती केल्यास संभाव्य पाणी टंचाईला दूर ठेवण्यात यश मिळू शकते.