मंचर: आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावात महिला सरपंचपदाचे आरक्षण आहे. जनतेतून लोकनियुक्त सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु, बहुतांशी गावामध्ये महिलां सरपंचाचे पतीच सरपंच असल्याच्या तोर्यात वावरताना दिसत आहेत. महिला सरपंच पतींची ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये लुडबूड वाढल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महिला सरपंचांचे पती ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य व विरोधकांना विचारात न घेता आपली मनमानी चालवत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजीची भावना आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (Latest Pune News)
महिला सरपंचांचे पती ग्रामपंचायत कारभारामध्ये लक्ष घालत असल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. काही महिला सरपंचांचे पती, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता ग्रामसेवकांशी संगनमत करून परस्पर ग्रामपंचायतीची कामे मार्गी लावताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांमध्ये महिला सरपंच व त्यांच्या पतीविरोधात नाराजीचा सूर आहे.
याबाबतच्या तक्रारी स्थानिक आमदारांपर्यंत जाऊ लागल्या आहेत. काही गावांमध्ये ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये हमरीतुमरी होत आहे. काही गावांमध्ये महिला सरपंचांचे पतीच ग्रामपंचायत माध्यमातून होणारी कामे स्वतः ठेकेदारामार्फत करून घेत आहेत.
बहुतांश ठिकाणी महिला सरपंच या फक्त कागदोपत्री सही करत असून त्यांच्या पदाचा कारभार हे त्यांचे पती पहात आहेत. महिला आरक्षण घटनेने दिले असले तरी यामागचा उद्देश पतींच्या ग्रामपंचायतीतील हस्तक्षेपामुळे सफल झालेला दिसत नाही. काही ठिकाणी महिला सरपंच ग्रामपंचायत पदाधिकार्यांना जुमानत नसल्याने डोकेदुखी होऊन बसली आहे. त्याचा परिणाम गावाच्या विकास कामांवर होत आहे.