मंचर: कोलतावडे (ता. आंबेगाव) येथील वृक्षतोडीप्रकरणी विनापरवाना वाहतूक करण्यात आलेल्या ४८ सागवृक्षांचा साठा मंचर (ता. आंबेगाव) येथील गजानन आरागिरणीच्या आवारात आढळला. त्यामुळे वन विभागाने संबंधित आरागिरणी शुक्रवारी (दि. १२) सील केली.
वन विभागाकडून करण्यात आलेल्या तपासात कोलतावडे परिसरातील वृक्षतोडीनंतर ४८ सागवृक्षांची विनापरवाना वाहतूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या वृक्षांचा साठा मंचर येथील गजानन आरागिरणीच्या आवारात करण्यात आल्याचेही तपासात पुढे आले.
याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत उपवनसंरक्षक जुन्नर यांनी संबंधित आरागिरणी तत्काळ बंद करण्याचे आदेश मंचर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून सदर आरागिरणी बंद केली. वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी विनापरवाना वृक्षतोड, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
वन विभागाची पूर्वपरवानगी न घेता साग वृक्षांची वाहतूक अथवा साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. वनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वनविषयक नियमांचे पालन करावे.विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर