मंचर: मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ (ता. आंबेगाव) येथील खत व औषधाच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन सराईतांना मंचर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ येथील किरण कैलास कुंदळे यांच्या सह्याद्री कृषी उद्योग या खत-औषध दुकानात गुरुवारी (दि.1) रात्री चोरट्यांनी चोरी केली. यात दुकानातील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीचा माल कार (एमएच 15 डीएम -8127) मधून मंचर ते सुलतानपूर रोडवरील नवीन पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाखाली विक्रीसाठी आणला जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत संतोष पोपट नलावडे (वय 34, रा. नानेकरवाडी, चाकण) व अमर संतोष नायक (वय 19, रा. खराबवाडी) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपये किंमतीची कार तसेच चोरीतील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे असा एकूण 8 लाख 11 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या पथकाने केल्याची माहिती हवालदार नंदकुमार आढारी यांनी दिली.