मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. २०) कांद्याची मोठी आवक झाल्याने कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली. गुरुवारी सुमारे ४० हजार कांदा पिशव्यांची आवक झाल्याने बाजार समिती परिसर अक्षरशः कांद्याने फुलून गेला होता. कांदा पिशव्या ठेवण्यासाठी जागा अपुरी पडल्याने वाहनतळाच्या जागेतही कांदा ठेवण्याची वेळ आली.
मंगळवारी (दि. १८) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला १० किलोसाठी सुमारे ४५० ते ५४० रुपये बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे बाजारभाव आणखी वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.
त्यामुळे गुरुवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. गुरुवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोसाठी सुमारे ५०० ते ५२५ रुपये बाजारभाव मिळाला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी ही माहिती दिली. मोठ्या आवकेमुळे बाजार समितीतील व्यवस्थेवरही ताण आला होता.- वसंतराव थोरात, कांदा व्यापारी, मंचर
मंगळवारी चांगला बाजारभाव मिळाल्याने भाव आणखी वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी आवक वाढल्याने भाव वाढले नाहीत. सध्या मिळत असलेला भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहे.- अशोकराव बाजारे, शेतकरी, सातगाव पठार
गुरुवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला तुलनेने समाधानकारक भाव मिळत असला तरी आवकेनुसार भावात चढ-उतार होणे स्वाभाविक आहे.- वसंतराव थोरात, कांदा व्यापारी, मंचर