भिगवण: ऊस टोळीसाठी दिलेले पैसे परत घेण्यासाठी बीपी व शुगरचा त्रास असलेल्या बीड जिल्ह्यातील एकाला अकोले येथील दोघांनी मानसिक त्रास दिला. परिणामी संबंधित व्यक्तीचा ’बीपी लो’ होऊन शुगरही वाढली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोघांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून यातील एक जण पोलिस दलात कार्यरत आहे.
नाथा पांडुरंग कवटेकर (वय 56, रा. पिठी, ता. पाटोदा, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, सध्या भोर विभागात पोलिस विभागात कार्यरत असलेल्या तुषार दराडे याच्यासह बाळू खाडे (दोघेही रा. अकोले, ता. इंदापूर) या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद मृताचा मुलगा विनोद नाथा कवटेकर यांनी दिली आहे. ही घटना 21 ते 22 सप्टेंबरदरम्यान घडली आहे. (Latest Pune News)
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू खाडे व तुषार दराडे यांनी संगनमत करून नाथा कवटेकर यांना ऊस टोळीसाठी दिलेले एक लाख परत घेण्यासाठी अकोले येथे जबरदस्तीने बसवून ठेवले. कवटेकर यांना बीपी व शुगरचा त्रास आहे हे त्यांना माहिती असतानादेखील पैशांसाठी दोघांनी मानसिक त्रास दिला व 57 हजार रुपये फोन पे द्वारे घेतले.
उर्वरित पैशांसाठी पुन्हा मानसिक त्रास देण्यात आला. यामुळे नाथा कवटेकर यांचा ’बीपी लो’ झाला आणि शुगरही वाढली. त्यातून त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यातदेखील हलगर्जीपणा दाखवण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.