तळेगाव ढमढेरे: कासारी (ता. शिरूर) येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शेतात आढळून आलेली कोल्ह्याची पिले ही कुत्र्याची पिले समजून घरी आणली. मात्र, एका नागरिकाच्या सतर्कतेने त्या पिलांची प्राणिमित्रांकडून सुटका करत त्यांना निसर्गात मुक्त करण्यात आले.
कासारी येथे तात्पुरत्या वास्तव्यास काही ऊसतोड कामगार कुटुंबीयासमवेत आली आहेत. या कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना दिली.
त्यानंतर वनरक्षक भोरडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरूर वन विभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, प्रकाश रासकर यांनी तातडीने त्या ठिकाणी जात पाहणी केली.
या वेळी ऊसतोड कामगारांच्या मुलांनी कुत्रे समजून कोल्ह्याच्या 3 पिलांना घरी आणल्याचे आढळले. वनरक्षक व प्राणिमित्रांनी कोल्ह्याच्या पिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या शेतातून मुलांनी पिले आणली त्या शेताजवळ नैसर्गिक अधिवासात त्या पिलांना मुक्त केले.