पुणे

पुणे: ओतूरच्या आठवडे बाजारात भरदिवसा तरुणीला भोसकले, मदतीला आलेल्या महिलेवर वार

अमृता चौगुले

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गर्दीने गजबजलेल्या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या आठवडे बाजारात शुक्रवारी (दि. २६) दुपारी एका तरुणाने अचानकपणे तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. यावेळी मदतीला आलेल्या महिलेवर देखील त्या तरुणाने चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या पोटात देखील वार केले. भर बाजारात हा हल्ला होत असताना नागरिकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या खळबळजनक घटनेने बाजारात काही काळ घबराट पसरली होती. वर्षा शांताराम खरात (वय ३२, रा. जांभळे, ता. अकोले, जि. अहमदनगर) व ज्योती अंबादास वायकर (वय ३५, रा. ओतूर, ता. जुन्नर) अशी चाकू हल्ला झालेल्या दोघींची नावे आहेत. तर संतोष मारुती ठोसर (वय ३४, रा. मांदारने, ता. जुन्नर) असे हल्लेखोराचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी ओतूरचा आठवडे बाजार भरला होता. दुपारी साडेचार वाजता संतोष ठोसर व वर्षा खरात या दोघांमध्ये काही कारणास्तव बाजारातच वाद होऊन बाचाबाची झाली. यामध्ये वर्षा खाली कोसळली. यावेळी संतोषने त्याच्याजवळील चाकू बाहेर काढून वर्षावर हल्ला चढविला. तो निर्घृणपणे तिला भोसकत होता. यावेळी वर्षाच्या मदतीला ज्योती वायकर या धावून आल्या. मात्र त्यांच्यावरही संतोषने दोन ते तीन वार केले. त्यातही वर्षाने प्रतिकार करत त्याच्या तावडीतून सुटका केली आणि ती पुढे पळत सुटली. मात्र १०० मीटर अंतरावर गेली असता अति रक्तस्त्राव झाल्याने ती एका दुकानासमोर पडली. संतोषने तिच्या पोटात जवळपास पाच ते सहा वेळा भोसकले होते.

त्यानंतर संतोषने देखील स्वतःच्या पोटात दोन ते तीनवेळा चाकूने भोसकले. दरम्यान वर्षा हिला उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर संतोष ठोसर याच्यावर नारायणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने बाजारात मोठी खळबळ उडाली. काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

नागरिकांची बघ्याची भूमिका

ही घटना घडतेवेळी बघ्यांची तोबा गर्दी होती. शेकडो लोकांसमोर संतोष ठोसरने वर्षावर चाकूने वार केले. गर्दीपैकी एकाही व्यक्तीने त्यास रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, ज्योती वायकर यांनी वर्षाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही संतोषने वार केल्याने त्या ही जायबंदी झाल्या. यावेळी नागरिकांसह व दुकानदारांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT