दापोडी : जुनी सांगवी येथील ममतारनगर मुख्य डांबरी रस्त्याला तडे गेल्याने रस्ता खचण्याचा संभाव्य धोका होता. येथे अपघात टाळण्यासाठी तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांमधून मागणी होती. याबाबत 18 मार्च रोजी दै. 'पुढारी'मध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. दोन वर्षांपूर्वीदेखील येथेच रस्ता खचला होता.
तक्रार करून त्या वेळी दोन वेळा दुरुस्ती करून घेतली होती. ममतानगर भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्यावरून मुळा नदी किनारा भागातील रहिवासी पुणे औंध, दापोडीकडे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. याच रस्त्यावर मंदिर, दत्त आश्रम असल्याने या परिसरात भाविकांचीही गर्दी असते. दोन वर्षांपूर्वीदेखील याच परिसरात रस्ता खचला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर याची दुरुस्ती करण्यात आली होती.
मात्र रस्त्याला पुन्हा तडे गेल्याने रस्ता खचण्याचा धोका लक्षात घेऊन रस्ता दुरुस्तीची सांगवी करांची मागणी होती. याबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीची दखल घेत स्थापत्य विभागाकडून येथील छावा चौक ते नवीन होत असलेल्या सांगवी बोपोडी पुलापर्यंत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची गुणवत्ता काय यावरून दिसत आहे. ठेकेदारांमार्फत काम केले जाते, पण यावर काम करताना अधिकार्यांचे लक्ष मात्र नसते.
जुनी सांगवी येथील हा रस्ता अनेक वर्षांपासून धोकादायक होता. यापूर्वीही डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने डांबरी रस्त्याला भेगा पडल्या होत्या. आता मात्र काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशाकडून समाधान व्यक्त होत आहे
– साईराज भोसले, जुनी सांगवी
येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या काँक्रिटीकरण पूर्वीची कामे, ड्रेनेज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर स्ट्रॉम वॉटरचे काम करण्यात येईल. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
– सुनील दांगडे, अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका